शहाजीराजे मुघल बादशाहीकडे: शहाजीराजे निजामशाहीत परतले खरे, पण त्यांना तिथे स्वास्थ्य मिळाले नाही, कारण खुद्द निजामशाहाच हलक्या कानाचा व धरसोड वृत्तीचा होता. त्यामुळे दरबारात कारस्थाने व हेवेदावे यांना ऊत आला होता. त्यातून निजामशाहाच्याच चिथावणीने लखुजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली. या घटनेची चीड येऊन शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले. मुघल बादशाहा शाहजहानने त्यांना आपली सरदारकी बहाल केली. दरम्यान वजीर फत्तेखानने मुघलांशी आतून हातमिळवणी करून निजामशाहाचीच हत्या केली. फत्तेखान फितुरीने निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले. एवढेच नव्हे, तर त्याची बक्षिशी म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलुख मुघलांनी त्याला परस्पर देऊन टाकला, तेव्हा शहाजीराजांनी संतापून मुघलांची बाजू सोडली आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय केला.
नव्या निजामशाहिची स्थापना: वजीर फत्तेखानास व मुघल बादशाहास शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एक मुल शोधून काढले आणि जुन्नरजवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशाहा म्हणून जाहीर केले. अशा प्रकारे त्यांनी एक नवे राज्यच स्थापन केले. या राज्यात गोदावरी ते नीरा या दरम्यानचा प्रदेश मोडत होता. आपल्या या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या शर्थीने लढले. या कामी आदिलशाहाने प्रथम त्यांना साथ दिली, पण पुढे खुद्द मुघल बादशाहा शाहजहान दक्षिणेत शहाजीराजांवर चालून आला आणि त्याने आदिलशहास तंबी दिली, तेव्हा आदिलशहाने शहाजीराजांच्या विरोधात त्याच्याशी मैत्रीचा तह केला. आता मुघल व आदिलशाही यांच्या संयुक्त फौजांशी शहाजीराजे गनिमी काव्याने लढू लागले; परंतु एकटे शहाजीराजे त्यांच्याशी किती दिवस लढणार ? त्यांची शक्ती अपुरी पडू लागली. तेव्हा नाइलाज होऊन १६३६ साली त्यांनी मुघलांशी तह केला. शहाजीराजांना काळ अनुकूल नव्हता, म्हणून त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापण्याचा प्रयत्न तडीस गेला नाही; परंतु त्यांच्या या धाडसामुळे मराठी लोकांत आत्मविश्वास निर्माण झाला. शिवरायांना हा आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापण्याच्या कार्यात उपयोगी ठरला.

0 Comments