Saint Dnyaneshwar - संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर आपेगावचे राहणारे. निवृत्तीनाथ व सोपानदेव हे त्यांचे बंधू. मुक्ताबाई हि त्यांची बहिण. त्या वेळचे कर्मठ लोक या मुलांना संन्याशाची मुले म्हणून नावे ठेवत, त्याचे कारण असे- त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतलेला होता. घर सोडले होते, पण पुढे गुरूच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले. पुढे त्यांना हि चार मुले झाली. हे त्या वेळच्या कर्मठ लोकांना मान्य नव्हते. लोकांनी त्यांना वाळीत टाकले होते. लोक त्या मुलांचा छळ करत होते.ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले; पण कोणी त्यांना भिक्षा घातली नाही. सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले. त्यांच्या बालमनाला खूप दु:ख झाले. ते आपल्या झोपडीत आले. झोपडीचे दार बंद करून आत दु:ख करत बसले. इतक्यात तेथे मुक्ता आली. गवताच्या ताटीवर टिचक्या मारत ती ज्ञानेश्वरांना म्हणाली, "ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अहो, आपण दु:खीकष्टी होऊन कसे चालेल? जगाचे कल्याण कोण करील?" बहिणीच्या उपदेशाने ज्ञानेश्वरांना हुरूप आला. दु:ख विसरून ते कामाला लागले. ठिकठिकाणी गोरगरिबांचा, मागासलेल्या लोकांचा धर्माच्या नावाखाली छळ होत होता. तेव्हा ज्ञानेश्वरांनी लोकांना कळकळीचा उपदेश केला, "ईश्वरावर श्रद्धा ठेवा. सगळ्यांशी समतेने वागा. दु:खी माणसांना मदत करा, त्यांचे दु:ख नाहीसे करा." त्यांचा उपदेश गेली सातशे वर्षे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात एकसारखा घुमत आहे.त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथामध्ये बंदिस्त झाले होते. सर्वसामान्य लोकांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मात्र मराठी होती. ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून 'ज्ञानेश्वरी' हा फार मोठा ग्रंथ लिहिला. धर्माच्या ज्ञानाचे भांडार त्यांनी लोकांना खुले करून दिले. लोकांना बंधुभावाची शिकवण दिली. ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. आजही लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने दरसाल आषाढी - कार्तिकीला आळंदी - पंढरीला जातात.
0 Comments