Maratha Sardar- Bhosale's dutiful family/मराठा सरदार- भोसल्यांचे कर्तबगार घराणे =
- धामधुमीचा काळ: संतानी लोकांच्या मनात भक्तीभाव निर्माण केला, तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली. तो काळच मोठा धामधुमिचा होता. विजापूरच्या आदिलशाहा आणि अहमदनगरचा निजामशाहा या सुलातानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत. लढाईसाठी त्यांना फौज लागे. या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत.
- शूर मराठा सरदार: मराठे काटक व शूर होते. तसेच ते धाडसी होते, स्वामिनिष्ठ होते. लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे. हातात भाला, कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत. मराठे सरदार फौजबंद असत. कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला, कि सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी. त्याला सरदारकी देई. कधीकधी जहागीरही देई. जहागीर मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत.
- शौर्याची परंपरा: हे सारे सरदार शूर वीर होते, पण त्यांच्यापैकी अनेकांचे आपापसात हाडवैर असे. स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती. त्यामुळे त्यांचे शौर्य त्या वेळी परक्यांच्या उपयोगी पडत असे; पण असे असले तरी, महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली. त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले. मराठे सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले. महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरुळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले.
0 Comments